४८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा - प्रदर्शन (१९७६ पासून )

 ४८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा - प्रदर्शन (१९७६ पासून )



दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित.  दिवाळीतील फराळ, व फटाके दोन दिवसांत संपत असले तरी अंकांच्या निमित्ताने दिवाळीची आठवण वर्षभर ताजी राहते. आजच्या काळाचे प्रतिबिंब त्यामध्ये पडलेले असते. आशा-आकांक्षा, साद-पडसाद व ध्येय - स्वप्ने यांची अपेक्षापूर्ती करण्याचे वार्षिक काम उत्सवी स्वरूपात दिवाळी अंकांच्या माध्यमातून पहिल्या मनोरंजन दिवाळी अंकापासून होत आले आहे. सर्वसामान्य वाचकांना चौकस व बहुश्रुत करीत असतात. त्याचप्रमाणे सुजाण रसिक जणांची अभिरुची संपन्न करीत असतात.  ११४ वर्षाची मराठी भाषेची ही वैभवशाली "दिवाळी अंक" परंपरा मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे निरंतर जोपासत आली आहे. यावर्षी वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी भाषेचा परंपरेचा हा ठेवा संस्थेच्या वतीने यावर्षी  महाराष्ट्रात मुंबई-ठाणे यासह बृहन्महाराष्ट्रात मध्य भारतात इंदूर आणि परदेशात अमेरिका लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविणार आहे. मध्यप्रांतातील मराठयांचे राज्य असलेल्या माळवा प्रांतात इंदूर येथील १०९ वर्षाची म्हणजे १९१५ मध्ये स्थापन झालेली "महाराष्ट्र साहित्य सभा" इंदूर, ग्वाल्हेर देवास येथील मराठी भाषिक प्रेमींसाठी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करणार आहे तर या उपक्रमात अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे MCF Foundation - मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल marathicultureandfestivals.com ही संस्था पारितोषिके घोषित करून सहभागी होत आहे.MCF च्या वतीने मुंबई आणि इंदूरमधील दोन्ही कार्यक्रम त्यांच्या संपर्कात असलेल्या परदेशातील हजारो मराठी भाषिकांपर्यंत podcast द्वारे पोहोचविणार आहेत.

संस्थेच्या वतीने १९७६ पासून ही स्पर्धा विनामूल्य घेतली जाते. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही सर्वाधिक अंक येत असतात. स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकांना - सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार, आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट ललित दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल लॉस एंजिइल्स पुरस्कृत सातत्याने प्रकाशित होणारा सर्वात जुना दिवाळी अंक,  मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल लॉस एंजिइल्स पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विशेषांक पुरस्कार, यासह उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. निकालानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. यावर्षी संपूर्ण १ संच इंदूर येथील मराठी भाषिकांसाठी देण्यात येणार आहे.  

दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती – रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ मोबाईल - ९३२३११७७०४ येथे पाठवाव्यात. तसेच अधिक  माहितीसाठी स्पर्धा संयोजक - राजन देसाई ८७७९९८३३९०  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.





एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ